- अशैक्षणिक कामे
अशैक्षणिक कामे : जि.प.शाळा संपवणारं ‘SLOW POISON’
आज भल्या पहाटे स्वप्न पडलं. गावातले तलाठी महोदय चक्क हातात खडू घेऊन विद्यार्थ्यांना भूगोलशिकवत होते,ग्रामसेवक महोदय विद्यार्थ्यांना नागरिक शास्त्राचे धडे देत होते, सरकारी बँकेचे कर्मचारी विद्यार्थ्यांकडून फळ्यावर गणिते सोडवून घेत होते,दवाखान्यातील डॉक्टर महोदय पेशंट्स सोडून हातात शरीर सांगाडा घेऊन शरीरातील पचन प्रक्रिया विद्यार्थ्यांना शिकवत होते, सरकारी कार्यालयातील बाबू तर विद्यार्थ्यांकडून शुद्धलेखनाचा सराव करवून घेत होते. आज शाळेतील वातावरण सर्व आलबेलच होते. एवढ्या सर्व कर्मचारी लोकांमधे नेहमीचा मास्तर कुठे दिसत नाही म्हणून एका वयोवृद्ध इसमाने तलाठी महोदयांना विचारले , “ आप्पा, आज सर्व गुरुजी लोक सहलीला गेलेत की काय ?” ह्या प्रश्नावर स्मित हास्य करीत आप्पा उत्तरले , “ नाही बाबा ,आपले मास्तर सहलीला नाही तर राष्ट्रीय कामात स्वत:चे योगदान द्यायला गेलेत.
एक गुरुजी गेलेत लोकांचे आधार नंबर लिंक करायला , एक गेलेत मतदार याद्या अद्ययावत करायला , एक गेलेत लोकांच्या संडासात उभे राहून फोटो काढायला , एक गेलेत पंचनामा करायला , एक गुरुजी पाच वर्षापूर्वीच्या माहितीचा अहवाल बनवण्यात दंग आहेत, आपल्याकडे इंटरनेटची सोय नसल्याने काही गुरुजी गेलेत ऑनलाइन कामाला............” अशाप्रकारे तलाठी आप्पांनी गुरुजींच्या कामांची यादीच वाचून दाखवली आणि पुढे म्हणाले , “ ह्या सर्व गोष्टीत गुरुजी व्यस्त असल्याने सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने आम्हास येथे पाठवले आहे , शेवटी निरागस चिमुरड्यांना शिक्षण देणं हे देखील एक राष्ट्रीयकामच, नाही का?” आप्पांचे हे बोलणे ऐकून त्या वृद्धाला गहिवरून आले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रु निघतीलच तेवढ्यात माझ्या डोळ्यांवर माझ्या सौभाग्यवतींनी पाण्याचे शिंतोडे उडवले आणि त्या स्वप्नविश्वातून मला बाहेर आणले. “ उठा लवकर ! सकाळीच परसाकडं जाणारी बाया-माणसे तुम्हाला ईचारीत व्हती , म्हणले गुरुजी हाईत ना घरी...त्यांनाआज आमच्या गल्लीत पाठवा..आधार कार्ड कालचतालुक्यावरून बनवून आणलं...आमची लिंकिंग बाकी हाय म्हणावं ...”
राष्ट्रीयकामाचा एवढा सुंदर समन्वय ही वास्तविकता नसून केवळ एक सुंदर स्वप्न होते ह्याचे भान होताच डोक्याला हात मारून पुन्हा काही मिनिटे तसाच पडून राहिलो.........जनगणनेसंदर्भातली काही कागदे पॅड ला जोडून बाहेर पडलो. रस्त्यावर माझा एक विद्यार्थी त्याच्या आभासी कारच्या आभासी आवाजाचा आनंद घेत ड्रायविंग करत होता. त्याचे लक्ष माझ्याकडे गेले तसे त्याने त्याच्या गाडीला ब्रेक लावला आणि मला म्हणाला , “नमस्कार गुरुजी ! आज शाळलां येणार नवं तुम्ही ?” त्याच्या ह्या अनपेक्षित प्रश्नाने मी अचंबितच झालो आणि थोडासा गोंधळूनच म्हणालो, “ येणार म्हंजी , येईनच की....... !” माझं उत्तर संपण्याच्या आतच तो म्हणाला , “ नाही , काल तुम्ही बबण्यालाही असच म्हणलं व्हतं, म्हणून ईचारलं म्या ! एवढं बोलून त्याने पुन्हा त्याची आभासी कार चालू केली आणि गेयर बदलून पुढच्या वाटेला लागला. मी पण माझ्या वाटेला लागलो पण त्याची ती वाक्यं सोबत घेऊनच !
शिक्षक बनून राष्ट्राची पिढी घडवण्याची संधी मिळावी यासाठी शिक्षकी व्रत स्वीकारले. बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध संकल्पनाशिक्षणातून घेऊन सेवाव्रताला सुरुवात केली. उत्साहपूर्ण सुरुवातीनंतरकाही वर्षांनी तालुक्याच्या तहसील कार्यालातून एक कॉल आला आणि माझे अभिनंदन करीत ते म्हणाले की , “ अभिनंदन सर ! आपली BLOम्हणून नेमणूक झाली असून आज दुपारी तीन वाजता तालुक्याला मीटिंग आहे. तरी आपण उपस्थित राहावे.” BLO ! काय आहे BLO? शब्द थोडा नवीनच वाटला पण आपल्या चांगल्याकार्याची तहसीलने जाणीव ठेवून सेवेच्या अल्पावधीतच एखाद्या चांगल्या शैक्षणिककार्यासाठी निवड केली असावी असे मला वाटले. मीटिंगला प्रत्यक्षातBLO म्हणजे काय व त्याची कार्ये काय हे समजून घेतल्यानंतर थोडसं गोंधळल्यागत झालं. सदर कार्याचा उल्लेख D.ed च्या प्रथमवर्षी होता की द्वितीय वर्षी याबाबत मी विचार करायला लागलो. खूप विचार केल्यावरही सदर विषयाचे अध्यापन आपल्या प्राध्यापकाने केल्याचे किंवा अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये वाचल्याचे मला आठवले नाही.
माझ्याशेजारच्या दोन अनुभवी BLO मधील चर्चेकडे माझे लक्ष गेले. एक BLO दुसर्या BLOला दबक्या आवाजात म्हणत होता , “ ही असली अशैक्षणिक कामे आपण आणखीन किती वर्षे करावीत?”दूसरा तेवढ्याच दबक्या आवाजात म्हणाला , “ जब तक है जान... करावीच लागतील भावा, नाहीतर राष्ट्रीय कर्तव्यात कसुर केल्याबाबतचे गुन्हे आपणावर दाखल होतील.”राष्ट्रीय कर्तव्य ! ऐकून थोड नवलचं वाटलं. एका शिक्षकासाठी त्याच्या समोर मोठ्या आशेने ज्ञानाचा अनुभवघेण्यासाठी येणारी चिमूरडी , आपल्या आईबाबांनंतर शिक्षकावरच सर्वात जास्त विश्वास ठेवून शालेय वातावरणातरममाण होणारी, आपल्या चेहर्यावर निरागस भाव घेऊन येणारी ,गोंडस चेहर्याची बालके ज्यांना आपण राष्ट्रीय संपत्ती मानतो , त्यांना शैक्षणिक अनुभव देऊन जगाच्या स्पर्धेत लढण्याचे सामर्थ्य निर्माण करणे हे राष्ट्रीय कार्य आहेकी अश्या प्रकारची आशैक्षणिक कामे पूर्ण करणे ही राष्ट्रीय कामे आहेत ? बरं ,अश्या प्रकारच्या राष्ट्रीय कामांसाठी एकटा आमचा प्राथमिक शिक्षकच का जबाबदार ? या देशात विविध विभागांमध्ये कामे करणारे सरकारी कर्मचारी आहेत मग राष्ट्रीय कामांसाठी एकटा शिक्षकच का ? दहा वर्षातून एकदा होणारी जनगणना, पंचवार्षिक निवडणुका ही कालमर्यादित कामे असून त्याबाबत आमचे शिक्षक बांधव कधी ओरड करणार नाहीत. पण राष्ट्रीय कामाचे बंधन टाकून वारंवार आमच्याजिल्हा परिषदेतेतील शिक्षकाला त्याच्या मूळ कार्यापासून परावृत्त केले जात असेल तर ही अशैक्षणिक कामे आमच्या जिल्हा परिषद शाळा संपवणारं ‘SLOW POISON’ नाही तर आणखीन काय ?एकीकडे आमचे सन्माननीय अधिकारीगण जिल्हा परिषद शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढावी याकरिता विविध शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करीत आहे. गेल्या वर्षी राबवला गेलेला‘गुणवत्ता विकास कार्यक्रम असेल किंवा ह्या वर्षाचा ‘प्रगत शैक्षणिकमहाराष्ट्र’ असेल, प्रत्येक स्तरावरून शैक्षणिक गुणवत्तेबाबत चिंतन होऊन जिल्हा परिषदेतील विद्यार्थी गुणवत्ता कशी वाढवता येईल यासंदर्भात प्रयत्न होत आहेत. एवढच काय तर आत्ता आमचा जिल्हा परिषदेतील शिक्षक अध्यापनाची जुनी घोंगडी फेकत ज्ञारचनावाद व तंत्रज्ञानाच्या मदतीने अध्यापनाची नवीन कात अंगावर घेत आहे. यासाठी अनेक ठिकाणी शिक्षकांनीस्वयंस्फूर्तीने लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या आमचा शिक्षक प्रशासनाच्या सकारात्मक चेतनेने भारीत होऊन जोमाने कामाला लागला होता. पण त्यातच एक मिठाचा खडा म्हणजेहे आधार लिंकिंग चे काम पुन्हा जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्याच माथी मारण्यात आले. आम्ही ज्ञानरचनावाद आणिडिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आमच्या जिल्हा परिषद शाळांतील बालकांचा सर्वांगीण विकाससाधून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवण्यासाठी मोठ्या उत्साहाने कामाला लागलो पण अश्या क्षणी ही अशैक्षणिक कामे शिक्षकांमधे असंतोषाची लाट निर्माण करीत आहे.अशैक्षणिक कामांसाठी मी ‘Slow Poison’ हा शब्द फार जबाबदारीने वापरत आहे. SLOW POISON एखाद्या सजीवावर धीम्या गतीने त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम करून त्याचा अंत करत असते. तशी ही अनेक प्रकारची अशैक्षणिक कामे जिल्हा परिषद शाळांमधील प्रत्येक घटकांवर दुरागामी दुष्परिणाम घडवून खाजगीकरणाची वाट तर नाही ना धरणार याची भीती वाटते......!मन ह्या गंभीर विचारात गुंतलेलं असतानाच एका गावकर्याने हाक मारली , “ राम राम हो गुरुजी ! या इकडं ... आपल्या आधारच लिंकिंग बाकी हाय जणू..म्हणूनच हाक मारली...बसा दमानं,पानी आणतु ........!”(BLO किंवा तहसील मार्फत राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम एवढच एक काम म्हणजे अशैक्षणिक काम नव्हे , अशैक्षणिक कामांची यादी फार मोठी आहे. सध्याचा ज्वलंत विषय म्हणून BLOच्या कामावर भर देऊन अशैक्षणिक कामांमुळे बालकांचे होणारे शैक्षणिक नुकसान आणि त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील गुणवत्तेवर होणारा परिणाम याचे गुणोत्तर माझ्या वैचारिक पातळीनुसार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.)************************************************************************अशोक आण्णा बागले(अशैक्षणिक कामांमध्ये गुरफटून अनेकदा बालकांनाविद्यार्जनापासून वंचित ठेवणारा गुन्हेगार शिक्षक)
No comments:
Post a Comment