८ मार्च –आंतरराष्ट्रीय महिला दिन……
आज २१व्या शतकात आपण महिलांनी बरीच मजल मारली आहे..आज प्रत्येक क्षेत्रात ती पाय रोवुन उभी आहे..आणि हे कौतुकास्पद आहेच..एका जर्मन महिलेला महिलांच्या कष्टाची जाणीव झाली आणि ती जगा समोर यावी या साठी तिने प्रयत्न केले…असंख्य कामगार महिलांनी तिला उत्तम साथ दिली..२०व्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत जगभरातील जवळ जवळ सर्व स्त्री वर्गाला मतदानाचा हक्क नाकारलेला होता.पुरुष प्रधान संस्कृतीचे हे एक विदारक सत्य होते.या स्त्री –पुरुष विषमतेसाठी ,अन्यायाला वाचा फ़ोडण्यासाठी स्त्रिया प्रयत्नशील होवु लागल्या होत्या. या साठी १९०७ मध्ये स्टुट गार्ड येथे पहिली आंरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली होती.त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय तडफ़दार कम्युनिस्टवादी महिलेने “सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे” अशी जोरदार घोषणा केली. ८मार्च १९०८ ला न्युयॉर्क मध्ये स्त्री कामगारांनी प्रचंड प्रमाणात निदर्शने केली. कामाच्या ठीकाणी सुरक्षितता आणि सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क या दोन प्रमुख मागण्या केल्या.या अमेरिकेतील महिलांच्या व्यापककृतीने प्रभावित होवुन क्लारा झेट्किन ने हा प्रश्न डेन्मार्क मधील कोपनहेगन या शहरात दुस-या आंतरराष्ट्रीय महिलांच्या परिषदेत मांडला …तो दिवस होता ८ मार्च १९१०…..अमेरिकन स्त्री कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस म्हणुनच जागतिक महिला दिन म्हणुन साजरा होवु लागला.
यावर्षी १०० वर्ष पूर्ण होताहेत या दिवसाला, म्हणुन जगभर जोरदार शताब्दी वर्ष साजरे होत आहे.
या १००वर्षाच्या कालखंडात खरच स्त्री खुप पुढे निघुन गेली आहे. आज ती प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करताना दिसते..पूर्वी चूल आणि मूल करणारी स्त्री आज त्या जबाबदा-या संभाळून देखिल आर्थिक क्षेत्रात खंबीर उभी आहे..पण पण—
खरच ती स्वतंत्र आहे? असा प्रश्न पडतोच.आज पुरुषांच्या विखारी नजरा, बालिके पासून वृद्ध्ये वर ही अत्याचार होताना दिसतात..गर्दीत, समाजात, शाळेत, नातेवाईकांत आज एकटी स्त्री असेल तर ती खरोखरीच सुरक्षित आहे का? नोकरीच्या ठीकाणी, लोकल मध्ये, अपरात्री प्रवास करणारी स्त्री सुरक्षित आहे? …..तर नाही हेच उत्तर येइल..ही परिस्थिती खेड्या पाड्या पासून मोठ्या शहरांपर्यंत एकच आहे.. ज्यांना घरातुन पुरुषी साथ आहे, भक्कम आधार आहे..त्या सोडल्या तर परितक्त्या, विधवा, एकाकी रहाणा-या, ज्या बालिका अनाथ आहेत अशा स्त्रियांचे स्त्रीत्व नक्कीच धोक्यात आहे.पण त्या घाबरतात म्हणुन ही असेल म्हणा..पण ही सत्य परिस्थिती आहे. ज्या या ही परिस्थितीत खंबीर ताठ मानेने उभ्या आहेत त्यांना समाज टरकून असतो….खरतर स्त्री ही जात्यात भित्री असते असे म्हणतात, तिच्या वर टीका ही केली जाते..पण स्त्री ही घाबरते ते फ़क्त पुरुषांना..हे कटु सत्य नाकारता येणार नाही..
अत्याचारी स्त्री किंवा ज्या घरी स्त्रीवर अतोनात अत्याचार घडलेले किंवा घडत असतात, आजुबाजुला स्त्री वर होणारा अन्याय बघत असतात, ते लोक नवीन स्त्रीजन्माला म्हणजे मुलीला जन्म द्यायला घाबरु लागलेत..त्यात लग्न हा व्यापार बनू लागला आहे, महागाई प्रचंड , खाणारी तोंडे घरात अनेक …अशाने मुलगी जन्माला आली तर तिचे संगोपन, मोठी होइ तो पर्यंत डोळ्यात तेल घालुन संभाळणे, लग्न कार्य आणि समाजाच्या वाईट नजरा या पासून सुटका केली तर बरे! या कारणाने तर आज मुलीच्या जन्मावरच प्रश्न चिन्ह उमटले नसेल ना? म्हणुन तर स्त्री भ्रूणहत्या घडत नसतील ना? हा प्रश्न मनात आल्या वाचुन रहात नाही.
८मार्च हा दिवस सगळीकडे जोरदार साजरा होताना दिसतो..वेगवेगळ्या स्पर्धा , फ़ॅशन शो, यावर अतोनात खर्च होताना दिसतो..त्या पेक्षा स्त्रीवर होणारे अत्याचार, बालिकेपासून मोठ्या मुलींना कसे संभाळावे, त्यांची सुरक्षितता.. अन्यायावर तोडगा….विवाहानंतरचे समुपदेशन, घटस्फ़ोटा पासून संसार वाचवणे —घराघरात भांडणे –तंटे होवु नयेत, स्त्री स्त्रिची खरी मैत्रीण आहे..शत्रू नव्हे….अशा अनेक विषयावर प्रबोधने चर्चीली जावीत असे मला वाटते..
आज आपण मध्यमवयीन स्त्रीया महिला दिन आला कि बाहेरचे प्लॅन आखतो …दिवसभर बाहेर रमतो पण मोलकरणीच्या जीवावर!…..त्या ही महिला आहेत हे आपण का लक्षात घेत नाही…का त्यांना एक दिवस आपण सुट्टी बहाल करत या दिवशी?
असो! अनेक बाजु आहेत महिला दिनाच्या साज-या करणावरुन…महिलांपुढे अनेक आव्हाने आहेत , पण सर्वात जास्त आहे ते म्हणजे तिची सुरक्षितता तिचे आरोग्य ..आणि घरगुती हक्क!
आज बाहेरच्या समाजातुन तिला अनेक हक्क मिळालेले आहेत…नव्हे ते तिने मिळवले आहे ..
पण आज घरात बहुतेक ठीकाणी पुरुष सत्ताच चालते..काही महत्वाचे निर्णय घेताना गृहलक्ष्मीचे मत विचारात घेतले जात नाही..तिला फ़क्त निर्णय ऐकवले जातात ..तर असे न होवु देता..तिला योग्य तो सन्मान मिळणे आवश्यक आहे.आरोग्याची काळजी तिने स्वत:च घेतली पाहिजे..त्यासाठी स्वत;साठी रोज काही तास बाजुला ठेवुन योग, फ़िरणे,किंवा स्वत:च्या छांदात तिने रमवुन घेतले तर ती जास्त आरोग्य प्राप्त करु शकेल.
“निरोगी, हसतमुख आणि शांत स्त्री घराचे वैभव असते.”…………
अशी नवी म्हण करायला हरकत नाही.
———————————————
सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी
जयसिंगपूर.(जिल्हा कोल्हापूर
No comments:
Post a Comment