THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday, 13 January 2017

शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय का?

शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय का? या प्रश्नाचे उत्तर खेळखंडोबा झाला आहे. परंतु, काही अंशी बाकी आहे असे द्यावे लागेल. शिक्षणाची मोठी परंपरा आपल्याला लाभलेली आहे. परंतू आज जागतिकीकरणाच्या युगातच या शिक्षणाचा खेळखंडोबा का झाला? याची बरीच कारणे आहेत. परंतू नोकरी मिळविण्याचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहण्याची प्रवृत्ती वाढीस लागली हे महत्त्वाचे कारण सांगता येईल. अर्थात ते बऱ्यास अंशी योग्यही आहे. मग याचबरोबर येणारा नोकरभरतीतील भ्रष्टाचार, कारकुनी पद्धतीचे शिक्षण, अभ्यासक्रमातील दोष, संस्थाचालकांचा हस्तक्षेप आणि त्यामुळे शिक्षणाचे झालेले बाजारीकरण या बाबी खेळखंडोबा होण्यास कारणीभूत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक कारणे सांगता येतील.
कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण असो, आज जागतिकीकरणाच्या युगात शिक्षणाला बाजारू स्वरूप प्राप्त झालेले आहे. मूळात विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांवर आजच्या व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. त्यांच्यावर व्यवस्थेमुळे विविध बंधने येत आहेत, काहीवेळा आणली जात आहेत. विनाअनुदानित तत्त्वावर बरेच प्राध्यापक कित्येक वर्षे काम करत आहेत. परंतु संस्थाचालकांचा हस्तक्षेप आणि प्राचार्यांचा बुजगावणेपणा ,सरकारचे महाविद्यालयांतील विविध बाबींवर नसणारे नियंत्रण किंवा या दोहोंचे असणारे लागेबांधे यांमुळे विनाअनुदानित तत्त्वावरील या प्राध्यापकास न्याय मिळत नाही. उपाशी पोटी ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे ह्या दोन्ही गोष्टी आजच्या काळात न केलेल्याच बऱ्या. अर्थात शिक्षणप्रणालीमध्ये यामुळे काय फरक पडत असेल हा संशोधनाचा मुद्दा आहे. कवी प्रभाकर लोंढे यांनी कवितेतून बिनपगारी शिक्षकांची व्यथा योग्य शब्दात मांडली आहे ते म्हणतात.
काय सांगू भाऊ आता
शिक्षकांची बिनपगारी व्यथा
फुकटामंदी दिवस चालले
खाता खाता लाथा....
शिक्षणाचा खेळखंडोबा होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अभ्यासक्रम. पारंपरिकतेबरोबर नवता स्विकारायला आपली अभ्यासमंडळे का तयार होत नाहीत? हा सुद्धा आणखी संशोधनाचा मुद्दा आहे. काळानुरूप अभ्यासक्रम बदलायला हवेत जेणेकरून कोणताही विद्यार्थी काळाच्या ओघात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर टिकू शकेल. अभ्यासमंडळांमध्ये अशा प्रकारचे गट आहेत जे स्वत:च्या ओळखीच्या फडतूस लेखकांच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करतात. ही पद्धत रूढ झाल्यामुळे प्राध्यापकांना ती नाइलाजास्तव शिकवावी लागतात आणि विद्यार्थ्यांनाही सहन करावी लागतात. परिणामी विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास होत नाही. एकच एक दृष्टिकोन तयार होतो. यावरही नियंत्रण असायला हवे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देता येईल. मराठीसारख्या विषयामधून नोकरी, व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उदा. पटकथालेखन, पत्रकारिता, मुद्रितशोधन, प्रकाशनव्यवसाय, सुत्रसंचालन, नियतकालिकांचे संपादन, भाषांतरकार इत्यादी. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाची गरज आहे, असे प्रत्येकच विषयात/क्षेत्रात योग्य अभ्यासक्रम तयार करायला हवेत.
शिक्षणातील खेळखंडोबा होण्यासाठी सर्वात जास्त कोणती गोष्ट कारणीभूत असेल तर, ती आहे नोकरभरतीतील भ्रष्टाचार. या वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित झाला आहे. नोकरभरतीत पैशाची देवाण घेवाण केली जाते त्यामुळे गुणपत्ताधारक विद्यार्थ्याला डावलले जाते. अशा चांगल्या विद्यार्थ्याला डावलल्यामुळे विविध दोषांनी परीपूर्ण असलेले शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते परिणामी त्यामधून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे पहावयास मिळते. सरकार विविध शिक्षणसंस्थांना भरभरून अनुदान देते परंतु ते विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वापरले जाते का? जे सरकार या शिक्षणासंस्थाना अनुदान देते, त्या सरकारच्या प्रत्यक्ष या संस्थांच्या कोणत्याही बाबींमध्ये हस्तक्षेप नसतो आणि यामधून भ्रष्टाचार वाढत आहे. याबाबत कडक कायदे करण्याची आवश्यकता आहे.
भारतावर इग्रंजानी तब्बल दिडशे वर्ष राज्य केले. आपल्या मधून कारकून निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतीय शिक्षणाचा पाया घातला गेला. हे सर्वज्ञात आहेच. पण तीच शिक्षणपद्धती आज लागू केली जात असेल तर, हे आजच्या काळात तरी पटण्यासारखे नाही. मग असा प्रश्न निर्माण होतो की, आपण स्वातंत्र्यात आहोत की पारतंत्रात? आपण उदयाची नवी पिढी घडवतोय की कारकून? भारत महासत्ता कसा होईल हा तर फारच मोठा प्रश्न आहे. एकीकडे आपण मंगळापर्यंत मजल मारली परंतु दुसरीकडे आपल्याच देशात आपल्या उदयाच्या भावी पिढीमुळे काय प्रश्न आहेत. याच्याकडे आपण कधी पाहणार आहोत. आजच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झालाच आहे. अपवादात्मक काही शिक्षण संस्था वगळता सर्रास संस्थाचालकाचा होणारा हस्तक्षेप, अभ्यासक्रमातील दोष, नोकरभरतीतील भ्रष्टाचार, कारकुनी पद्धतीचे शिक्षण, या सर्व बाबींमुळे आपली भावी पिढी काळाच्या ओघात टिकू शकेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. आज देशभरात असंख्य ठिकाणी उच्चशिक्षण, तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत आणि त्यामध्ये दरवर्षी भर पडत आहे. आपल्या शिक्षणाचा हेतू काय आहे? हेच अजून बऱ्याच अंशी समजलेले दिसत नाही. आणि त्यामधून भविष्यकालीन ध्येयधोरणे निश्चित झालेली दिसत नाही. शिक्षणाचा हेतू विशिष्ट विषयातील ज्ञान संपादन करणे व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून घेऊन समस्यांचे निराकरण करणे जीवन अधिक सुखी, सुरक्षीत, सुसह्य करणे हा आहे. ही गोष्ट आपल्या विस्मरणात गेली आहे. महात्मा फुले म्हणतात, 'विद्येविना मती गेली' परंतु आता विद्या असुनही गती गहाण ठेवली जात आहे किंवा गहाण ठेवण्यास भाग पाडले जात आहे असे दिसते.
आजच्या शिक्षणपद्धतीची साहित्याने त्याचबरोबर, चित्रपटाची दखल घेतली आहे. शिक्षणातील या अनिष्ठ रूढींवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसते. उदा. निशाणी डावा अंगठा (चित्रपट कांदबरी), सैराट (चित्रपट), शिक्षणाचा आयचा घो! (चित्रपट), जोहार (कादंबरी) अशी अनेक उदाहरणे देता येतील. ही प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. यांचा अभ्यास केला तरी शिक्षणाचा खेळखंडोबा का झालाय? आणि याला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, हे लक्षात येईल. अभ्यास आणि ध्यास या संकल्पना काळाच्या ओघात मागे पडलेल्या दिसतात. अर्थात् हे विधान सर्वांना लागू होत नाही. किंवा या लेखातील मांडणी सर्वांच्या बाबतीत लागू होत नाही त्याला अपवाद असू शकतो.
बऱ्याचदा असे लक्षात येते की, अलीकडील इंग्रजी माध्यमांमुळे सर्वजण इंग्रजीकडे आकर्षित झालेले आहे आणि त्याशिवाय पर्यायच नाही अशी धारणा निर्माण झालेली आहे. परंतु या देशातील असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे घेतली तर आपल्या असे लक्षात येईल की, त्यांनी आपले शिक्षण मातृभाषेतून घेतले होते आणि जी गोष्ट मातृभाषेतून अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते ती दुसऱ्या कोणत्याही भाषेतून समजू शकत नाही. अर्थात् दुसऱ्या भाषा आत्मसात करू नये असे म्हणणार नाही.
मोरोपंतानी एका आर्यामध्ये म्हटले आहे की,
विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगा माजी|
न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी|
जर विद्येने मनुष्याला श्रेष्ठत्व येत आहे, जगातील सर्व गोष्टी तो पाहू शकतोय तर शिक्षणाचा हा खेळखंडोबा तो का पाहू शकत नाही हा प्रश्न आहे?

No comments:

Post a Comment