राजमाता जिजाबाई
जिजाऊ … जिजामाता … राजमाता जिजाबाई भोसले … मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री … अशा अनेक नावानी आपण यांना ओळखतो. ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत.सिंदखेडचे पाच हजारी मनसबदार लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते. वाढत्या वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या. पुढे डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला. जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली होती. शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मी ही - पारतंत्र्यात आहोत, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता जिजाऊ भोसले !!! -
सौजन्य :
http://www.baalpan.com/samajik/article-story/rajmata-jijau
खूप छान माहिती दिली राजमाता जिजाऊ जयंती भाषण मिळेल का
ReplyDelete