THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday, 18 October 2016

'वाचन प्रेरणा दिन'

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साजरा कण्यात येत आहे याविषयी काय सांगाल ?

भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना विधानसभेत श्रद्धांजली अर्पण करताना मी डॉ.कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असे जाहीर केले होते. त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या 15 ऑक्टोबर रोजी शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की, डॉ.कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. जसे त्यांच्यामध्ये असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव. यामुळेच डॉ.कलाम यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून पुढे येणार आहे, भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे, हे त्यांनी सांगितले आहे. डॉ.कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन केले जात आहे. या वाचन प्रेरणा दिनामध्ये अधिकाधिक कार्यालये, बँका, कार्पोरेट कार्यालये यांनीही सहभाग घ्यावा आणि वाचन संस्कृतीला बळकट करावे असे आवाहन मी करीत आहे.

वाचन प्रेरणा दिनामागची नेमकी भूमिका काय आहे ?

शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे. वाचनामुळे होणारे फायदे, अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो, विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होतो हेच नेमके या उपक्रमातून साध्य करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. म्हणूनच शाळा महाविद्यालयापर्यंत हा उपक्रम सिमित न ठेवता आपण सर्वांनी वाचले पाहिजे, असे मला वाटते. 'वाचाल तर वाचाल' असे म्हटले जाते. आजच्या 21 व्या शतकातही हे आपल्याला तंतोतंत पटणारे आहे. आजचा शाळेत जाणारा विद्यार्थी असो वा महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना टी.व्ही, स्मार्ट फोन, टॅबलेट, कॉम्प्युटर यापासून बाजूला करुन त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. हा दिवस त्या दिना पुरता मर्यादीत न राहता नेहमीच पुस्तक, मासिक, साहित्य यांचे वाचन व्हावे ही आपली प्रामाणिक भावना आहे.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त 15 ऑक्टोबर रोजी कोणकोणते उपक्रम घेण्यात येणार आहेत ?

शाळांमध्ये दर आठवड्यातील एक तास अवांतर वाचनासाठी राखीव ठेवणे, शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये डॉ.अब्दुल कलाम वाचन कट्टा तयार करणे यासारखे उपक्रम वाचन प्रेरणा दिनानिमित्त हाती घेण्यात येणार आहेत. या दिनाच्या निमित्ताने शाळांनी इनोवेटिव्ह फंडामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तके खरेदी करून वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत. तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये वाचनाचे महत्व पटवून देण्यासाठी साहित्यिकांमार्फत मार्गदर्शन करण्यात यावे. वाचन दिनाच्या निमित्ताने त्या दिवसातील एक तास वाचनासाठी देण्याचा प्रयत्न करावा. तसेच एकमेकांना पुस्तक भेट देणे, आई ने वडिलांना देणे, मुलाने वडिलांना देणे, पत्नी ने पतीला पुस्तक भेट देणे असा उपक्रम साजरा व्हावा जेणेकरुन सर्वांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल. याशिवाय वाचन दिन अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी सोशल मीडियाचा वापरही करण्यात यावा. आमच्या विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाचा खास लोगो तयार करण्यात येणार आहे, हा लोगो व्हॉटस्ॲपच्या तसेच ट्विटर च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवून त्याचा प्रचार करण्यात येणार आहे. तसेच साहित्यिक, मान्यवर व्यक्तींनी वाचनाचे महत्व सांगणारे ट्विट करावे, असे आवाहनही मी या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने करणार आहे. मुळातच विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये वाचनाची आवड, ओढ व प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्त्व पटावे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुळातच वाचनसंस्कृती ही व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम करीत असते. म्हणून शाळा आणि महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भेट योजनेबद्दल काय सांगाल ?

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भेट योजनाही या दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात यावी, असे आवाहन मी केले आहे. या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या शाळेला किंवा ग्रंथालयाला पुस्तक भेट देऊ शकेल. वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने शाळेत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करावा, समाज सहभागातून या कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करुन शाळेत पुस्तकपेढी तयार करावी, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा, प्रत्येक ‍शिक्षकाने ऑक्टोबर अखेरपर्यंत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या किमान एका पुस्तकाचे वाचन करावे, एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबवला जावा, प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी एका विद्यार्थ्यांला किंवा शाळेला विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरूप होतील अशी पुस्तके भेट द्यावीत, विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करता यावे म्हणून ‘वाचू आनंदे’ या तासिकेचे आयोजन करणे, चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्रांचे आयोजन करणे, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांवर आधारित व्याख्यानाचे आयोजन करणे, परिसरातील लेखक, कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार याविषयीची माहिती देणे, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नेते व वाचन यांची उदाहरणे देऊन चर्चासत्रे घडवून आणणे, पुस्तकांचे वाटप करुन ‘वाचक दिन’ आणि ‘अध्यापन दिन’ साजरा करणे, विद्यार्थ्यांचे गट करुन विविध पुस्तकांवर चर्चासत्रे घडवून आणणे, शाळांनी पुढाकार घेऊन ‘पुस्तके तुमच्या भेटीला’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे, असे विविध उपक्रम आणि याव्यतिरिक्त देखील विविध उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करता येणार आहेत.

आपण स्वत: याबाबतचा आराखडा केला आहे, याविषयी काय सांगाल ?

मुळातच विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळावे यासाठीचे हे पहिले पाऊल आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेऊन मुलांनी आनंदाने वाचन करावे हा यामागचा हेतू आहे. आपण सहज अगदी कोणाला काहीतरी भेटवस्तू देत असतो, ही भेटवस्तू पुस्तक असावे म्हणून पुस्तक भेट योजना आखण्यात आली आहे. व्याख्यान, अभिवाचन, चर्चासत्र, कार्यशाळा, पुस्तक प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, निबंध स्पर्धा, वाचन कट्टा या माध्यमातून मला वाचन चळवळ उभी करायची आहे. वाचनाने काय साध्य होऊ शकते हे आजच्या मुलांना दाखवून देण्यासाठी हा उपक्रम आहे. म्हणूनच अगदी सोपी माध्यमे निवडूनच आम्ही आराखडा तयार केला आहे. शाळांमध्ये वाचन प्ररेणा किंवा वाचन संस्कृतीशी संबंधित विषयावर व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. तर शाळा- महाविद्यालये लेखकांशी त्यांच्या लेखनाविषयी, त्यांच्या कलाकृतीविषयी चर्चा करतील. निबंध स्पर्धा किंवा काव्यवाचन स्पर्धा किंवा अभिवाचन स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना किंवा वाचकांना यानिमित्ताने आपल्या आवडत्या पुस्तकाविषयी बोलता येणार आहे. वाचन कसे करावे, का करावे याबाबतही मार्गदर्शन होणार आहे. पुस्तके ही सतत आपल्या ज्ञानात भर कशी पाडत असतात याबाबतही यावेळी मान्यवर व्यक्तींकडून मार्गदर्शन होणार आहे.

मुळात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा काही एक दिवसाचा उपक्रम असू शकत नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयोग आणि प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मला वाटते. आजचा विद्यार्थी हा मोबाईल गेम, संगणकाच्या आहारी जात आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांला अवांतर वाचनासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाशी जोडून ठेवणे हा या वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश आहे. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. वाचनसंस्कृतीचा विकास आणि प्रसार आवश्यक असून भाषा विकासासाठीही तितकेच आवश्यक आहे.

वाचन प्रेरणा दिनासाठी इतर विभागांचीही मदत घेण्यात येणार आहे, त्याविषयी काय सांगाल ?

शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण या विभागाबरोबरच या उपक्रमासाठी मराठी भाषा विभागाची भूमिकाही महत्वाची आहे. तसेच ज्ञानाशी संबंधित सर्व विभागांचा सहभाग यात घेतला जाणार आहे. म्हणूनच या निमित्ताने आपण सर्वांनी पुन्हा वाचनाकडे वळावे, असे आवाहन मी करतो.

येत्या 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मी सुद्धा विरार पूर्व येथील आचोळे शाळा क्र 1 येथे जाणार आहे. तर वसई पश्चिम येथील वर्तक महाविद्यालय आणि मनोरीमधील ज्ञानसाधना विद्यामंदिर शाळेला भेट देणार आहे. तसेच या ठिकाणी डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा कार्यक्रम करण्यात येणार आहे. मुळात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश असून वाचन दिन हा फक्त एका दिनापुरता मर्यादित न राहता वाचनाचा हा उपक्रम निरंतर सुरु राहावा यासाठीचा हा प्रयत्न आहे.

चला तर मग डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करुया... पुस्तकांशी नातं जोडूया..... 

No comments:

Post a Comment