*क्वालिफिकेशन*
दहाएक वर्षांपूर्वी सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक शेखर कपूर यांनी लिहिलेला एक ब्लॉग मला आठवतो. शेखर कपूर यांनी एक भारीतला ब्लॅकबेरी फोन अमेरिकेतून खरेदी केला होता. आणि काही दिवसातच त्या ब्लॅकबेरी फोनचा काही तरी टेक्निकल लोच्या झाला. आता आली पंचाईत, त्या काळात ब्लॅकबेरीची सर्व्हिस सेंटर नव्हती. अनेक मोठया दुकानात शेखर कपूरने आपला फोन दाखवला पण सगळयांनी हात वर केले. हा फोन आता अमेरिकेला कुरियरने पाठवावा लागेल आणि दुरुस्ती करता कदाचित तीसेक हजार खर्च येईल, असा सल्ला काही हायफाय एसी मोबाईल सर्विस सेंटरने दिला. डायरेक्टरसाहेब तर हादरुनच गेले. ब्लॅकबेरी घेण्याचा गाढवपणा केलाच आहे तर आणखी एक गाढवपणा करुयात म्हणून एकेदिवशी त्यांनी आपली कार जुहू मार्केटच्या रस्त्यावरल्या एका टपरीवजा दुकानासमोर थांबवली. दुकानावर अस्खलित इंग्रजीत “Cellphoon reapars” अशी पाटी लिहिली होती. तरीही धाडसाने शेखर कपूर दुकानाकडे आले. त्या कळकट दुकानात हाडकुळासा ११-१२ वर्षाचा पोर मळकट, फाटकी जीन्स आणि टीशर्ट घालून उभा होता.
“ ब्लॅकबेरी ठीक कर पावोगे?,” कपूर साहेबांनी त्या पोराला अविश्वासाने विचारले.
“ बिलकुल.. क्यों नहीं,” तो फाटका पोरगा आत्मविश्वासाने म्हणाला. तो ११-१२ वर्षाचा पोर आणि त्याचा १८-१९ वर्षाचा मोठा भाऊ या दोघांनी मिळून ब्लॅकबेरीचा खराब झालेला पार्ट बदलला आण अवघ्या पाच सहा मिनिटात फोन ठीक करुन दिला.
“ कितना देना है ?”
“पाचसो.”
आठवडाभर वाट पाहणे आणि तीस हजाराच्या तुलनेत ही फारच छोटी रक्कम होती. त्यांनी पटदिशी पाचशेची नोट त्या पोराच्या हातात ठेवली. शेखर कपूर आपला फोन घेऊन निघत असताना आपल्या विस्कटलेल्या केसांवर हात फिरवत तो पोरगा म्हणाला, “सरजी, ब्लॅकबेरी इस्तेमाल करना है तो हाथ साफसुथरे होने चाहिये. गंदे हाथसे इस्तेमाल करोगे तो ये प्रॉब्लेम आ सकता है.” ज्यानं कदाचित मागच्या पूर्ण आठवडाभर आंघोळ केली असावी की नसावी, असा संशय यावा, असा तो फाटका पोर कपूर साहेबांना सांगत होता. शेखर कपूर लिहितात, “ही एवढीशी फाटकी पोरं जगातील कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान अवगत कसं करतात ? मला त्यांच्या डोळयांत माझ्या देशाचं भविष्य दिसत होतं. या पोरांची ही क्षमता विकसित केली पाहिजे, मला जाणवलं. ‘साहेब फोन वापरण्यापूर्वी हात स्वच्छ धुत चला’, तो पोरगा पुन्हा एकदा म्हणाला. आणि मला माझे हात खरोखरच खूप अस्वच्छ वाटू लागले.”
तुमच्या बरबटलेल्या हातांनी तुम्ही कसं नापास करणार या पोरांना? जगण्याच्या भरधाव रस्त्यावरली प्रत्येक परीक्षा ही पोरं लिलया पार करताहेत. या पोरांची कोणती परीक्षा घेणार तुम्ही? कोणत्या परीक्षेच्या तराजूत त्यांना तोलणार? मुळात बुध्दिमत्ता म्हणजे काय, हे आपल्याला तरी कुठं नीटसं कळलंय. दोन प्रकारच्या बुध्दिमत्तेपासून एकशे ऐंशी प्रकारच्या बुध्दिमत्तेपर्यंत मानसशास्त्रज्ञ चकरा मारताहेत. आता तर तुमच्या निव्वळ बुध्दयांकापेक्षा भावनिक बुध्दिमत्ता अधिक महत्वाचा आहे, हे सर्व मानसशास्त्रज्ञ सांगू लागले आहेत. म्हणजे तुमच्या कोणत्याही परीक्षेतील मार्कांपेक्षा तुमचं स्वतःवरील नियंत्रण, तुमची विश्वासार्हता, कर्तव्यनिष्ठा, लवचिकता आणि कल्पकता ही अधिक महत्वाची असते कारण या साऱ्यांची गोळाबेरीज म्हणजे तुमची भावनिक बुध्दिमत्ता आहे. मानवी बुध्दिमत्ता स्वतःला कोंडून घेत नाही,खडक फोडून वाहणाऱ्या झऱ्यासारखी ती स्वतःसाठी असंख्य रस्ते तयार करते, मल्टिपल ऑप्शन्स! आणि आपण लाखो रुपये खर्च करुन पोरांना महागडया शाळेत घालतोय, वर त्यांना तेवढ्याच महागडया टयुशन्स लावतोय पण आपण त्यांचे हात मळू देत नाही, त्यांना या अनवट रस्त्यावरुन ऊन, वारा, पावसात बेडर होऊन चालू द्यायला नाही. आपल्याला पहिल्या प्रयत्नात सारं काही हवंय, आपण त्यांना चुकू देखील द्यायला तयार नाही म्हणून तर आपली पोरं चांगलं पॅकेज मिळवताहेत पण ती एडीसनच्या चुका करत नाहीत, त्यांच्या कुंडलीत ‘युरेका योग’ नाही. आपण त्यांचा नारायण नागबळी विधी केव्हाच उरकलाय.
मन, मनगट आणि मेंदूचं नातं आपण विसरुन गेलोय. ज्ञानाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक कण हा साक्षात्कार असतो पण तो आपण पोरांना इस्टंट देऊ पाहतोय, आयता, शिजवलेला. पोरांना तो पचत नाही कारण तो त्यांनी शोधलेला नाही. लालासारखी पोरं, डाव्या हातचा मळ असावा तसं ब्लॅकबेरी काय आणि आणखी कोणता फोन काय, त्याचं मर्म आत्मसात करणारी पोरं, जगणं ‘ एक्सप्लोअर’ करताहेत, जगण्याला प्रत्यक्ष भिडताहेत म्हणून त्यांच्यात भवतालाबद्दलची आंतरिक समज निर्माण होतेय. आम्हाला ती कळत नाही, हा या पोरांचा दोष नाही. त्यांना मोजायला आपल्याकडं माप नाही, आपली फूटपट्टी मोडून पडलीय आणि नापासाचे शिक्के आपण त्यांच्यावर मारतोय. त्यांना पुन्हा पुन्हा ‘ दहावी फ’ च्या वर्गात बसवतोय कारण आपली सगळी सो कॉल्ड मेरिटोरियस पोरं ‘अ’ तुकडीत बसलीत. हातात नापासाची मार्कलिस्ट घेऊन नाऊमेद झालेली ही सारी पोरं, हे सारे लाला, भीमा, जब्या, नौशाद, जॉर्ज सारे भांबावून गेलेत. परवा दहावीचा निकाल लागला तेव्हा या साऱ्यांसाठी मी फेसबुकवर लिहलं होतं -
“ कोणतंही बोर्ड, कोणतीही परीक्षा तुम्हाला तोपर्यंत नापास करु शकत नाही जोवर तुम्ही स्वतःला नापास करत नाही. परीक्षेच्या फुटपट्टीने मोजावे, एवढे तुम्ही किरकोळ नाही आहात दोस्तहो ...तेव्हा सर्व सो कॉल्ड नापास लोक हो, चिल ...एकदम चिल! खरी परीक्षा वेगळीच आहे, तिथले विषय पण एकदम हटके आहेत... खोटं वाटत असेल तर दहावीला गटांगळया खाणाऱ्या नागराज मंजुळे, सचिन तेंडुलकर ,श्रीकांत सोनवणे वगैरे मंडळींना विचारा ...तुम्हांला ही लै मोठी नावं वाटतील पण अशी मंडळी तुम्हांला प्रत्येक गल्लीबोळात भेटतील जी बोर्डाची परीक्षा नापास झाले पण खऱ्याखुऱ्या परीक्षेत बोर्डात आले ...
तेव्हा त्या परीक्षेची तयारी करा ...!”
💐💐💐💐💐💐💐💐