भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे शिक्षण विषयक विचार
शिक्षण विषयक विचार
लेखन :- राजकिरण चव्हाण.
(दि. १५ ऑक्टोबर - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने)
भारताचे ११ वे राष्ट्रपती अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म १५ऑक्टोबर१९३१) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. विज्ञानाचा परमभोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा,मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने ‘पद्मभूषण, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांनी इ.स. २०२० पर्यंत विकसित भारताचे स्वप्न ते पाहिले. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने त्यांचे शिक्षण विषयक विचार या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
शिक्षकांच्या माध्यमातून ‘शिक्षण’ या शब्दाचा खरा अर्थ समजावून घेऊन तो विचार ज्या ज्या ठिकाणी माणसाचा सहभाग आहे अशा प्रत्येक क्षेत्रात प्रवर्तित केला, तर हे जग येथे राहण्यासाठी सर्वोत्तम जागा बनेल असा विचार माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी व्यक्त केला होता. ते विद्यार्थ्यांना नेहमी स्वप्ने बघावीत असा सल्ला देत. त्यासोबत असेही सांगायला विसरत नसत की, “स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात तर खरे स्वप्न ते असतात जे तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय झोपूच देत नाहीत.” डॉ. कलामांच्या प्रत्येक स्वप्नाला शिक्षणाचा स्पर्श जाणवतो. शिक्षण आणि शिक्षकांशिवाय देश प्रगतीपथावर जाऊच शकणार नाही असे ते मानायचे. जगात विकास व शांतता, सौंदर्य व निर्मिती या सर्वांचा मिलाप घालण्यासाठी शिक्षण अत्यंत गरजेचे आहे. कलामांनी आपल्या आयुष्यात शिक्षकांचे महत्त्व जाणले होते. त्यांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये आयुष्यावर प्रभाव टाकणाच्या व्यक्तींच्या यादीत त्यांच्या शिक्षकांचाही अग्रक्रमाने समावेश होता. इ. ५वी वर्गात शिकताना त्यांना रामेश्वर येथील शिव सुब्रमण्यम अय्यर नावाचे शिक्षक होते. त्यांच्या शिकविण्याचा परिणाम म्हणून आपण या संशोधनासारख्या क्षेत्राकडे वळालो असे कलाम सांगत. पक्षी कसा उडतो? कशी दिशा बदलतो? त्याचा वेग, नियंत्रण, झेप यासारख्या अनेक कृतींमध्ये शरीराच्या कोणत्या भागाचा वापर कसा केला जातो याबाबतची माहिती, पक्ष्यांसारखी भरारी मारण्यासाठी लागणाच्या इंजिनाचा शोध, त्यात लपलेल्या शक्तीचा शोध घेणाऱ्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडले. तेथून भविष्याच्या पाऊलवाटेचा विचार मनात पेरला गेला. शिक्षकांनी सांगितलेल्या दिशेने झेप घेण्यासाठी मी फक्त प्रवास सुरू केला आणि तो साध्यही केला असे ते म्हणायचे. खरे शिक्षक तर केवळ योजना आखतात आणि त्या योजना प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी योग्य विचारांची पेरणी करीत असतात. त्या प्रवासात विद्यार्थ्यांला ज्ञान मिळविण्यासाठी तयार करीत असतात. विचार, सृजनशीलता आणि कल्पनांचे स्वातंत्र्य मिळाले की मुलांना भविष्याला गवसणी घालण्याची अनामिक शक्ती मिळत असते. म्हणूनच त्यांच्या जीवनात आलेल्या अनेक शिक्षकांपैकी पहिले शिक्षक म्हणून मिळणारा मान अय्यर गुरुजींना जातो.
विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्याला ज्ञानासाठी तयार करणे, प्रत्येकवेळी मनात स्वप्न रुजवणे या गोष्टी शिक्षकाने करायच्या असतात. जीवनाच्या ध्येयाची ओळख करून देताना जीवन प्रवास सुलभ करण्याची दिशा दाखवायची असते. ‘फक्त पाठ्यपुस्तकाशी मैत्री करीत शिक्षणाचा मार्ग अनुसरल्याने शिक्षण होत नाही. शिक्षण प्रवासात मुलांच्या मनात आत्मविश्वास आणि हिम्मत रुजवायची असतो. मी हे करू शकतो. संपूर्ण आकाश कवेत घेऊ शकतो. निर्माण होणाऱ्या प्रत्येक समस्यांवर मात करू शकतो. ही हिम्मत शिक्षकांनी देण्याची आवश्यकता असते. पूर्वी कोणत्याही तंत्रज्ञानाचा गाजावाजा नसताना, प्रसारमाध्यमाची क्रांती नसताना, ज्ञानासाठीचे कोणतेही स्रोत नसताना शिक्षकांनी हे अविरत केले आहे. त्यामुळे शिक्षकांनी मनात आणले तर प्रत्येक वर्गात असे स्वप्नांच्या परिपूर्तीकरिता झटणारी अनेक माणसं निर्माण करता येतील, कोणत्याही संकटावर लीलया मात करू शकतील. हे त्यांच्या अय्यर गुरुजींनी केलेल्या शैक्षणिक संस्काराने प्रमाणित केले आहे. कलामांचा विश्वास शिक्षणप्रक्रियेवर होता. शिक्षण माणूस निर्माण करू शकते. ते सहजपणे बोलताना एकदा म्हणालेही होते की, “एखादे मुल सात वर्ष माझ्याकडे सोपवा. त्यानंतर ते मूल देव वा सैतान कोणीही न्यावे, ते त्या मुलाला बदलू शकत नाही. “मुलावर शिक्षणाचे दूरगामी परिणाम होत असतात. ध्येयाने प्रेरित झालेल्या शिक्षकांच्या आयुष्यात जी जी मुले आली त्या त्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाने बदल केला आहे. या देशाला पुढे न्यायचे असेल तर, मुलांना प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांची गरज आहे.शिकविणे म्हणजे फक्त शब्द, वाक्य वाचणे आणि तिचा अर्थ सांगणे असा नाही तर त्या दोन ओळीच्यामध्ये लपलेला जीवनाचा ‘खरा’ अर्थ शिक्षकांनी सांगायचा असतो. केवळ पुस्तक शिकवून झाले म्हणजे आपले काम संपले असे होत नाही. खरा शिक्षक तर त्या पलीकडे जीवनभर ज्ञानासाधक निर्माण करीत असतो. विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची रुजवात करीत असतो किंबहुना विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांच्या विकासाची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवत असतो. परिणामी उच्चतेचा ध्यास घेतलेल्या हजारो मुलांची निर्मिती होऊ शकेल. मनात असलेल्या लाखो प्रश्नांच्या मुळाशी जाऊन मुले काही शोधू पहात असतात. त्या शोधक वृत्ती, नवसंशोधनांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याकरिता शिक्षकांनी मदत करणे अपेक्षित असते. देशातील शिक्षक हेच वर्तमानातील विचारवंत असायला हवेत. शिक्षकांनी सतत जुन्यापासून बोध घ्या, नव्याचा शोध घ्या या विचाराने कार्य करायला हवे. मुलांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निरसन करण्याची शिक्षकांनी नेहमी तयारी दाखवायला हवी. विदयार्थ्यांना मदतीचा हात यायला हवा. मुलांच्या प्रश्नाच्या भोवती विचार करताना मुले जशी समृद्ध होतात परिणामी शिक्षकही समृद्ध होतच असतात.
शिक्षक आपल्या वर्गातील मुलांना कित्येक दशके, शतके पुढे नेत असतो. माझ्या आयुष्यात आलेल्या शिक्षकांनी मला जे काही दिले आहे. “माझ्या मनातील प्रश्नांचा पाठपुरावा करताना त्यांनी जी दिशा दाखविली आहे, त्यातून त्यांनी मला पाच दशके पुढे नेले आहे” असे सांगत ते शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. शिक्षक समाज ज्ञानमय करण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांसाठी आनंद साठवलेला असतो. विद्यार्थ्यांच्या आनंदात आनंद मानणारा शिक्षक सर्वत्र असतो. या देशाला आज कलामांनी सांगितलेल्या मार्गाने जाणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. तो प्रवास अवघड नाही पण, तो अशक्य आहे असेही नाही. त्याकरिता स्वत:ला झोकून देत नव्या व्यवस्थेत नव्या विचाराने काम करावे लागेल. नेहमीच जग सोबत असेलच असे नाही, पण हिमतीने मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. स्वत: ज्ञानाची साधना करावी लागेल. त्याकरिता गुरुंचा शोध, पुस्तकमैत्री करावी लागेल. विद्यार्थ्यांच्या आयुष्याकरिता ज्ञानाचे जे जे म्हणून स्रोत उपलब्ध आहेत त्या सर्व धुंडाळत नवा महामार्ग अनुसरावा लागेल. किंबहुना विद्यार्थ्यांसाठी स्वत:चे ध्येयही बदलावे लागेल...!
या वाचन प्रेरणा दिनाच्या माझ्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बांधवाना हार्दिक शुभेच्छा !
No comments:
Post a Comment