THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday 11 September 2020

*पुरोगामी व स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते -ऍडव्होकेट मोरेश्वर वासुदेव गोरे* 
      
भूतकाळाच्या विस्मृतीत गेलेलं असं एक  नाव ! मोरेश्वर गोरे !ज्यांचा एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात म्हणजे 12 डिसेंबर 1896 रोजी कोकणातील आंजर्ले या गावी  जन्म झाला. पारतंत्र्याचा काळ असल्याने शिक्षणाच्या सोयीसुविधा फार उपलब्ध नसलेल्या तेथीलच जानशी या छोट्याशा खेड्यात प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली व ते त्याच ठिकाणी पूर्ण केले.कोकणात आंजर्ले येथेच मावशी राहत असे. मोरेश्वर यांना प्रथमपासूनच मावशीचा फार लळा असल्याने तिने मोरेश्वर यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण तेथेच पूर्ण केले.पण पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी मात्र त्यांना पुण्याला जावे लागले.घरी अठरा विसे दारिद्रय! भिक्षुकी  व पूजाअर्चा  करून घरप्रपंच चाले.त्यात  आईचे लहानपणीच निधन झाल्यामुळे मावशीने मात्र, बहिणीच्या मुलाचा चांगला सांभाळ केला . आणि मोरेश्वर यांचे वडील वासुदेव यांनीही मुलांची जबाबदारी घेऊन आईवडील अशी दुहेरी जबाबदारी पार पाडली. तरी पण मावशीने आधार दिला शिक्षण केले,हे मोरेश्वर कधीच विसरू शकले नाहीत.
पुण्यात मामा राहत असे, त्यांची साधारण परिस्थिती असली तरी पण बहिणीची पोरे वाऱ्यावर सोडून देणं त्यांना फारसं रुचलं नाही.कारण बहिणीचे मोठे उपकार त्यांच्यावर होते . मामाने मोरेश्वर यांना शिक्षणासाठी पुण्यात बोलावून घेतले. पुण्यात मोरेश्वर, महाविद्यालयीन शिक्षण जरी घेत  असले तरी त्यांना आपला त्रास मामाने सहन केला ,तो माहिती होता कारण त्यांची परिस्थिती ही एवढी चांगली नव्हती.म्हणून त्यांनी काही मित्रांच्या ओळखीने जेवणासंबंधी काही सोय होते का ते पाहिले. बरीचशी मुलं वारांवर जेवत असत .अनेक लोक अशा होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेत, पदरी पुण्य लाभावे म्हणून वारावर जेवू घालत. वारावर जेवणे म्हणजे आठ दिवस ,आठ ठिकाणी वारानुसार सकाळ संध्याकाळ जेवण्यासाठी जायचं ही सोय मोफत असे. त्या काळी सधन लोक जाणीवपूर्वक अशा मुलांना आश्रय देत.
याचाच फायदा भावाला झाला व मामाने मोरेश्वर यांच्या मोठ्या भावाला पुण्यात बोलावून वारावर शिकवले. माधुकरी पेक्षा वारावर जेवणे मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने परवडते.मोरेश्वर तसे तैलबुद्धीचे .अभ्यासात पुढे ,मेहनती व शिस्त प्रिय, नियमितपणे आपल्या कामात रस घेणारे . पुण्यात कला शाखेत बी ए झाले पण त्यांना एल एल बी करून वकील व्हायचे होते. पुण्यात ,भाऊ मामांकडे असल्याने दोघांचा ताण मामांवर नको म्हणून आपण एल एल बी च्या शिक्षणासाठी पुणे सोडावे असे ठरले व पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. तेव्हा तेथे एका शिक्षकाच्या ओळखीने वकीलांच्या हाताखाली टिपणं टापणं व हिशेबनीस म्हणून काम करताना एल एल बी शिक्षण चालू ठेवले.पैशापरी पैसा मिळू लागला व अनुभवही घेता आला.
याच काळात एक चांगली घटना घडली. वकिलीचे शिक्षण घेत असताना  त्या वेळचे धुळ्याचे डे.कलेक्टर शिवराम पंत  भिडे यांची मुलगी शांताबाई हिचे स्थळ चालून आले  व कर्मधर्मसंयोगाने सर्व  काही जुळून आले व सन 1915 साली शुभ मुहूर्त काढून त्यांचा विवाह शांताबाई यांच्याशी अगदी साध्या पद्धतीने संपन्न झाला.शांताबाई बुद्धिमान व समंजस मुलगी !
पुढे,मोरेश्वर, मुंबईत एका शाळेत,
संस्कृतचे शिक्षक म्हणून नोकरीला लागले.पण अजून वकिलीचे शिक्षण पूर्ण झाले नव्हते.एकाच वेळी वकिलीचे शिक्षण, नोकरी व घरसंसार अशा तीन तीन आघाड्या उत्तमरित्या त्यांनी सांभाळल्या.
मुळात फारच कष्टात शिक्षण घेतले असल्याने शिक्षणाची किंमत काय असते ते पूर्ण जाणून होते.वर्गात जाताना तयारीसह जाणे, मुलांविषयी मनात कळकळ ,तळमळ, भलेही ती मुले कुणाची, कोणत्या जातीधर्माची , याचा विचार न करता आपले विद्यार्थी आहेत व त्यांना शिकवणे आपले कर्तव्य आहे .
पालकांनी पूर्ण विश्वासाने आपल्यावर मुलांना सोपवले आहे,
हा विवेक त्यांना होता.
आपल्या अध्यापनाचं कसब,एवढं प्रभावी ठेवले की ते मुलांचे प्रिय शिक्षक झाले.
शाळा प्रमुख ,त्यांची वाहवा करू लागले. पालकांचा विश्वास सार्थ केला .मुलांबरोबरच शाळेचीही गुणवत्ता सिद्ध केली. 
एक दोन वर्षे नोकरी केली ,पण मनातली वकिली करण्याची इच्छा  स्वस्थ बसू देईना.कारण वकिली करणे, हा आपला पिंड आहे व तो समोर ठेवूनच आपण इथपर्यंत आलो आहोत, हे त्यांचे ध्येय होते.
आणि तो दिवस उगवला .एल एल बी परीक्षेचा निकाल लागला आणि विशेष प्रावीण्यासह मोरेश्वर उत्तीर्ण झाले आणि मुंबई विद्यापीठाची वकिलीची सनद अभिमानाने स्वीकारली.
शाळेतील शिक्षक ,मुले याना सरांच्या यशाने आनंद झालाच , पण त्यांचे आवडते शिक्षक राजीनामा देणार होते ना!..म्हणून दुःखही झाले...
अखेरीस शाळेने आपल्या लाडक्या शिक्षकांना, जड अंतःकरणाने निरोप दिला.मुलांनी गोरेसरांच्या गौरवार्थ ,त्यांना मानपत्र देऊन आदराने निरोप दिला.
वकिलीची सनद घेतल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथे राहून वकिली करायचे निश्चित केले.
सन 1922-23 साली ते अहमदनगर येथे आल्यावर स्वतंत्रपणे वकिली करू लागले. त्यांना नगरची भूमी मानवली .लाभदायक पण ठरली . काही काळातच ते एक नामांकित वकील म्हणून नावारूपास आले.
वकिलीत चांगला जम बसवला.अर्थार्जनही समाधानकारक होऊ लागले.
परन्तु,न्यायालयात  मात्र युक्तिवाद करताना,
कायद्यानुसारच आपले वर्तन ठेवले.
त्यांची केस म्हणजे 'निर्णायक निकाल' !!
असे अनेक दावे त्यांनी निकाली काढले.
वकीलीत एक प्रकारचा आदरयुक्त दरारा व दबदबा निर्माण केला.त्यांचे कायद्याचं ज्ञान केवळ सखोलच होते असे नाही ,तर  ते लाॅ रिपोर्टरचा तपशीलवार स़ंदर्भ देत ,अशा वेळी न्यायमूर्तीही चकीत होत व मोरेश्वर देत असलेल्या अचूक संदर्भांची खात्री करीत असत.
 मुळात अंगी शिस्त असल्याने कोणतीही तडजोड केली नाही.
कोणत्याही केसचा पाठपुरावा करीत असत.
 स्वत: हजरजबाबी व वाक्पटू व नियमांचा कडवटपणा अंगी बाणलेला असा त्यांचा स्वभाव होता.
वकिली करीत असताना, शहरातील नामांकित राजकीय व सामाजिक धुरिणांशी संबंध आला.
याच काळात स्वातंत्र्यासाठी देशभर वेगवेगळ्या घटना घडत होत्या ,लोकमान्य टिळक यांच्या प्रखर व जहाल विचारांनी अवघा भारत इंग्रजी सत्तेविरुद्ध एक झाला होता.
मोरेश्वर यांच्यावरही लोकमान्य टिळकांच्या प्रभाव होताच.
वकिलीने जरी सावरले असले तरी, सामाजिक बांधिलकी व दायित्व जपणे, हा त्यांचा मूळ स्वभाव कसा जाईल ?
अहमदनगरला पतिपत्नी स्थायिक झाल्यानंतरची गोष्ट!!त्यांच्या ,कोर्टात जाण्यायेण्याच्या रस्त्यावर दादा चौधरी विद्यालय आहे. ते कोर्टात टांग्याने जात.
त्यावेळी नगरचे टांगे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात प्रसिद्ध होते. आज मात्र टांगे गल्लीच राहिली आहे .टांगे मात्र नावालाच उरलेत. त्यांचा नेहमीचा  टांगेवाला तोही वकिलसाहेबांची वेळ अचूक पाळत असे. त्यांचा टांगा अगदी घड्याळाच्या काट्यावर चाले. म्हणजेच मोरेश्वर अगदी तंतोतंत वेळेवर कोर्टात जात. हा टांगा बरोबर दहा वाजता दादा चौधरी शाळेतल्या फाटकाजवळून जाई व त्यांच्या या नियमित जाण्यायेण्याच्या वेळेवर जणू ह्या शाळेचा शिपाई शाळा भरण्याची घंटा देई.तो नंतर तर घड्याळही पाहत नसे.""चला, वकिलसाहेब आले ,"असे म्हणत ,घंटा वाजवत असे.ही शाळाही अगदी स्वातंत्र्यप्रेमाने भारलेल्या एका देशभक्ताने गोरगरीब व गरजू मुलांच्या शिक्षणासाठी 
 सुरू केली. तेथील काही मुलांना राहण्याची व जेवणाची सोय व्हावी असे काही वकीलांकडून समजले, तेव्हा त्यांनी संबंधित वकिलांना सांगितले की कुणी असा गरजू असेल तर पाठवा माझ्याकडे !
आणि ही होती वारावर स्वत: जेवल्यानंतर व्यक्त केलेली कृतज्ञता!!
गरीब मुलांना मोरेश्वर यांच्या घरी अन्नसेवनाचे स्थान मिळाले.प्रथम आठवड्यात केवळ एक वारी एक विद्यार्थी असे. पुढे जसजसे दिवस वाढत गेले तसतसे विद्यार्थी वाढले. आता तीन दिवस तीन विद्यार्थी घरी येऊ लागले.पुढे तर एकाच वारी तीन तीन विद्यार्थी घरी जेवणास येऊ लागले.खरे तर दोन जीव! पतिपत्नी !!अगदी ऐषोआरामात व हाताखाली नोकरचाकर ठेवून जगता आले असते, पण मोरेश्वरांच्या पत्नी शांताबाई मुलांसाठी मनापासून स्वत: राबत ! पतीला आवडणाऱ्या बाबी तर त्या मन लावून करत.असे एकमेकांना समजावून घेणारे ,अतूट विश्वास असलेले हे सुखी जोडपे आत्मसन्मानाने जगणारे !!
एक आदर्श युगुल म्हणून नगरमध्ये ख्याती असलेले असे !!
तीस वर्षे या माऊलीने न थकता वार-संस्कार केले. आपल्या मुलांप्रमाणे सर्वांना आपल्या अन्नातला  घासातला घास प्रेमाने खाऊ घातला.
मोरेश्वरांना वारांवर जेवण्याचे जितके चांगले अनुभव आले तेवढे कटू अनुभवही गिळावे लागले.म्हणून त्यांच्या घरी वाराने शिकणाऱ्या मुलांविषयी काही दंडक घरातच घालून दिले होते.ते सर्वांना पाळणे बंधनकारक होते....उदाहरणार्थ
"एक शिरस्ता म्हणूनच, यापुढे पाळला जाईल,की, आपण जे खातो तेच अन्न वारावरची मुले खातील.
 ती आपल्या बरोबर एकाच पंगतीला जेवतील .त्यांना ती घरी फुकट जेवतात म्हणून कोणतीही वैयक्तिक खाजगी, घरातील कामे सांगितली जाणार नाहीत.कुणाला लागेल असे बोल चुकूनही बोलले जाणारे नाहीत.किंवा *वारावर जेवणाची मुले* असं म्हणून त्यांना कुणाकडून ही हिणवलं जाणार नाही .
आपण फार मोठे उपकार करतो अशी अहं भावनाही केली जाणार नाही.
आणि हे नियम शिस्त शांताबाईंनी शेवटपर्यंत पाळली.त्यांच्या वर्तनात किंचितही ही फरक पडला नाही.
मोरेश्वर अतिशिस्तप्रिय व कर्मठ असले तरी पत्नीशी कडवटपणाने कधीच वागले नाहीत.
खरे तर या जोडप्याला तब्बल बावीस वर्षे अपत्य प्राप्ती झाली नाही.पण म्हणून कुणाला दोष दिला नाही मोरेश्वरांच्या पत्नी शांताबाई,यांना पण याचे  अप्रूप वाटे.
बावीस वर्षांनंतर परमेश्वरी कृपेने घरात पुत्ररूपाने माधव आणि कन्यारुपाने विजयाचा जन्म झाला.
( योगायोग म्हणा की पूर्वसंचित म्हणा,(विजया गोरे..पुढे अंजली माधव भावे झाल्या ),ज्यांनी मला या लेखन प्रपंचात बारकाव्यासह माहिती दिली. )
आयुष्यात स्थैर्य समाधान व अवखळ आनंद निर्माण झाला.
पण सामाजिक व शैक्षणिक कामात कधीच खंड पडला नाही.अहमदनगर जिल्हा तसा अवर्षणप्रवण 
 दुष्काळी!साथीचे रोग तेव्हा येत. आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. लोकांमध्ये अज्ञान ,अंधपरंपरा व देवभोळेपणा अधिक होता.
याच काळात मोरेश्वर यांचा शहरातील  एक नामांकित वकील म्हणून  वेगळाच आदर्श निर्माण झाला. राजकीय लोकांत उठबस वाढली.निरनिराळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना प्रमुख म्हणून निमंत्रित करण्यात येई.कित्येकदा त्यांनी लोकक्षोभ पत्करून अस्पृश्यता निवारण व जातिव्यवस्थेविरूद्धच्या उपक्रमात भाग घेतला.
यातूनच त्यांची लोकप्रियता वाढत गेली व सन 1941साली मोरेश्वर यांना अहमदनगर म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.या काळात त्यांनी एक तत्त्व बाळगले ,ते म्हणजे 
सत्ता ही सेवा आहे व आपली सत्ता ही लोककल्याणकारी असावी.शहरातील सुखसोयी आरोग्य स्वच्छता रस्ते पाणी व दिवे, यासाठी प्रयत्न केले.एवढे  मोठे पद मिळूनही पाय जमिनीवर ठेवले. डामडौल टाळला. शिस्त कायम ठेवून आपल्या कुटुंबाला स्वास्थ्य लाभेल असे पाहिले.
वकिली व्यवसायात राहिल्याने उंची राहाणीमान, भाषेत शुद्धता व शब्दांत गोडवा, पण  शिस्त असलेला कर्मठपणा हाही होताच ! स्वत: संस्कृतचे शिक्षक असल्याने, व्याकरण- शुद्धलेखन ,आपला मुद्दा पटवून देण्याचं कौशल्य आणि  पाठांतर सहजता!कुठे ही कृत्रिमपणा नाही.हसत खेळत शिक्षण व तोच गुण नात (विजया गोरेची मुलगी)वृषाली गोखले यांच्यापर्यंत आला.
हा चरित्रात्मक वारसा आजही त्यांनी नेटाने पुढे चालू ठेवला आहे.
जीवनात आनंद घेत, सर्वांना बरोबर घेऊन, दात्यांचे ऋण मस्तकी धारण करून, जीवन जगत राहिले .
येणाऱ्या संधिचे सोने केले.आपला वकिलीचा व्यवसाय उत्तम चालत होता ,कारण तो मनापासून स्वीकारलेला होता.मोरेश्वर वकिलांच्या तेव्हा असे लक्षात आले की अनेक गरीब मजूर कामगार यांचे रोजमान कमी असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागे.कधी गरीबांच्या घरात कुणाचा मृत्यू झाला तर अंत्यविधी करण्यासाठी सावकाराकडून व्याजाने पैसा घ्यावा लागे किंवा दुकानदार अधिक किंमत आकारत व हे कर्ज फेडता फेडता तो मजूर कर्जात आकंठ बुडत असे.या पिळवणूकीतून सुटका व्हावी म्हणून  गोरे वकिलांनी *प्रेतसंस्कार सहाय्यक समिती* स्थापन करून शहरातील उदार दाते, व्यापारी वकील दुकानदार यांच्या मदतीने  निधी उभारला व एक नियमावली तयार करून जे ,गरीब व गरजू आहेत अशांना ही समिती मदत करीत असे व या निधीतून अंत्यसंस्कार मोफत केले जात असत.
याचा फायदा खरोखरच अनेक गरीब व वंचित घटकांना झाला.अनेक वर्षे ही समिती गोरे वकिलांनी चालवली .
मोरेश्वर वकिलांच्या जीवनात आलेल्या त्यांच्या सुसंस्कृत पत्नी शांताबाई ! एक शांत संयमी व सुशील व्यक्तिमत्व ! शिक्षण जरी चौथीपर्यंत झालं असले ,तरी व्यवहार चतुर ,कर्तव्यदक्ष!! मोरेश्वरांचा संसार नुसता सांभाळलाच नाही,तर पतीला मनापासून पाठिंबा दिला.त्यांच्या इच्छा आकांक्षा व छंद जोपासले.सर्वांना बरोबर घेऊन आपल्या संसारात मुलाबाळांना वाढवले.संसार उगिनिगीचा कसा करावा ,बचत कशी करावी, येणाऱ्या जाणाऱ्या ची सरबराई कशी करावी, हे सारं शांताबाई जाणत असत.
 आता दोन्ही मुलांचं संगोपन शिक्षण यात आईबरोबर मोरेश्वर यांचा वाटाही तेवढाच महत्त्वाचा होता.त्यांनी मुलांना शिक्षणाचे बाळकडू घरातूनच सुरू केले.व्यवहार ,संस्कार व सामाजिक क्षेत्रात मुलांनी कसे वागावे असे अतिशय चांगले संस्कार केले.शांताबाई कलाकुशल होत्या .पाककला भरतकाम विणकाम शिवणकाम यात निष्णात होत्या.एवढेच नव्हे तर शहरात जेव्हा महिला स्पर्धा असत, विशेषतः काही सार्वजनिक मंडळे व नगर क्लब ,सार्वजनिक गणेशोत्सव ,मोहरम दुर्गोत्सव असताना अशा स्पर्धा घेत, शांताबाई प्राधान्याने स्पर्धेत सहभागी होत असत व हमखास बक्षीस मिळवत असत भरतकामातील सुबकता रंगसंगती तंतोतंतपणा आणि सफाईदार व बिनचूक काम कसे होईल हा त्यांचा नेहमीच आग्रह असे.त्यानी नंतर महिलांच्या आग्रहास्तव,आपल्या घरातच,स्वखुशीने शिकवले .नशीबापेक्षा श्रमावर त्यांचा फार मोठा विश्वास होता.
त्यांनी कधीच तळहातावरच्या रेषेवर विश्वास न ठेवता हाती आलेल्या श्रमातूनच आपले भविष्य घडते हे दाखवून दिले.ज्योतिषी मांत्रिक व कोणी केलेल्या भाकितावर विश्वास ठेवला नाही.शांताबाईंचं एक तत्त्वज्ञान होतं, जो भविष्यावर विसंबला त्याचा दुबळेपणा दिसून आला.भविष्य माणसाला दुबळे बनवते व अशा लोकांची कार्यक्षमता घटवते. ती एक मनाची समजूत आहे, समाधान आहे. सत्य कधीच असू शकत नाही.उदाहरणार्थ, त्यांच्या शेजारणीचा मुलगा तसा शिक्षणात गती असलेला होता, पण साऱ्या घराचा भविष्यावर फार विश्वास असल्याने ,कुणा ज्योतिषाने त्या मुलाच्या परीक्षेचे भाकित केले.की ' बाळा तू परीक्षेला काही बसू नकोस ,तुझे शैक्षणिक योग काही ठीक नसल्याने नापासाचा ठपका तुझ्यावर बसू शकतो ,अर्थात तू नापास होशील !'
हे जेव्हा शांताबाईंना शेजारणीने सांगितले, तेव्हा त्यांनी त्या मुलाची समजूत घातली की," अरे तू हुशार आहेस ! तुला असं वाटतं असेल की अभ्यास झाला नाही मी नापास होईन आणि ज्योतिषीबुवांनीही तेच सांगितले!पण तसं नको करू ,माझं ऐक !
तू परीक्षेला बस! कदाचित पासही होशील आणि परीक्षेला घाबरून तू भीतीने परीक्षाच देणार नसशील तर ही भीती तुझ्या मनातून कधीच जाणार नाही! तर ,यापेक्षा तू परीक्षेला बसून नापास झाला तरी चालेल ,पण ध्यानात ठेव न परीक्षा देता नापास होणं हा भित्रेपणा करू नकोस !हा डाग जन्मभर राहील! अनेक मुलं नापास होतात, ही सामान्य बाब आहे !तेव्हा तू बिनधास्त परीक्षा दे, आता आहे त्या वेळेचा फायदा घे अभ्यास कर ,काय होतं हे विसर ! आणि त्यामुलाने शांताबाईंनी सांगितलेले ऐकले.तो परीक्षेला बसला आणि उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला. इंग्रजी सत्ता आणि पारतंत्र्याच्या काळात या हौशी गोऱ्या लोकांनी शहरात अनेक ठिकाणी स्पोर्ट्स क्लब चालवले होते.नगरचे वाडिया पार्क अतिशय विस्तीर्ण मैदान आहे .तेथे निरनिराळ्या खेळाचे सामने खेळवले जात.टेनिस बास्केटबॉल हाॅकी क्रिकेटचे सामने भरविले जात .बुद्धिबळ ब्रीज सारखे सामने ही होत .गोरे वकिलांना घरात आण्णा या नावाने मुलं हाक मारत ,त्यामुळे क्लबमध्ये व खेळाच्या मैदानातही आण्णा हे नाव  प्रसिद्ध होते.
आण्णाही अशा स्पर्धेत भाग घेत.शांताबाई ह्या स्पर्धा पाहण्यासाठी जात! पण पुढे शांताबाई व काही देशी  महिलांनी तिथे लेडिज क्लब सुरू करावा असा प्रस्ताव मांडला .पण तो कसा सुरू करावा हेच माहीत नव्हते .जेंट्स क्लबमध्ये आपल्या पतीबरोबर एक पारसी समाजाची महिला येत असे ,त्या होत्या मिसेस टेमिना वाडिया !..यांनी क्लब कसा असतो वपरवानगी- रचना... ही सर्व माहिती गोळा केली .म्युनिसिपालटीत जाऊन जागा मिळवणे व परवानगीसह मंजूरीही आणली आणि लेडिज स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली. यात महिलांनी सहभाग घेतला.रिंग टेनिस , बॅडमिंटन सारखे खेळ सुरू झाले व यात शांताबाई पुढे चांगल्या क्रीडापटू झाल्या . अगदी पारतंत्र्याच्या काळातही महिलांना संधी उपलब्ध करून दिली जात होती व शांताबाई सारख्या महिला अनेक क्षेत्रांत पुढे येत होत्या .
हे करताना आण्णांनी विरोध तर कधीच केला नाहीच,उलट प्रोत्साहन दिले.पण हे छंद जोपासताना शांताबाईंनीही आपल्या घराकडे व मुलांकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.नाष्टा ,जेवण चहा व त्यांच्या येणाऱ्या मित्रमंडळीची चोख व्यवस्था त्या करीत.
थोडक्यात काय ,तर ज्या काळात स्त्रियांना व्यक्तिस्वातंत्र्यही नव्हते देशही पारतंत्र्याच्या अंधारात चाचपडत होता ,अशा काळात या मोरेश्वर गोरे यांनी पुरोगामी विचारांची कास धरीत आपल्या पत्नीला संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्य बहाल केले व ते एकमेकांनी जपलेही.हा एक कायदेपंडिताचा इतिहास अहमदनगरच्या विधीक्षेत्रात ललामभूतच म्हणावा लागेल. पुढे वकिली व्यवसायातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी अनेक होतकरू वकिलांना, मदत केली.
वयाच्या 87 व्या वर्षी, त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
पण, या सुवर्ण  कार्यकाळातील ऐतिहासिक घटनेवर ना चिरा ना पणती ना दिवा लावला गेला हे शल्य मनात आल्यावाचून राहणार नाही.
पण मोरेश्वरांच्या कन्या व त्यांची नात,वृषालीताईंनी यांनी या घटनाक्रमांची माहिती दिली व मी पण त्या काळातील दाखले व समक्ष व्यक्तीना भेटलो.

असा हा स्रीदाक्षिण्य व स्वातंत्र्याचा पुरोगामी विचारांचा वारसा, ऐतिहासिक नगर शहराच्या इतिहासातील एक सोनेरी पानच म्हणावे लागेल

No comments:

Post a Comment