कै. लालशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशाला, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सन २००६ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एका आगळ्यावेगळ्या मेळाव्याचे आयोजन केले. जवळजवळ १९ वर्षांनी आपल्या शाळेत परत एकत्र येण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. विद्यार्थी
या सोहळ्यात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आदरणीय शिक्षकही सहभागी झाले होते. सर्व शिक्षकांचा विशेष सत्कार करून त्यांना कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला प्रोजेक्टर आणि १५ किलो वजनाची पारंपारिक घंटा भेट दिली. या डिजिटल सुविधेमुळे विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून शैक्षणिक संकल्पना अधिक सहजपणे समजतील आणि त्यांना नवनवीन गोष्टी शिकता येतील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सयाजी शिंदे होते. त्यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, “कुटुंब, शाळा आणि समाज ही शिकवण आणि संस्कार देणारी तीन महत्त्वाची केंद्रे आहेत. प्रत्येकाने स्वतःला सामान्य न समजता आपल्या आवडत्या क्षेत्रात असामान्यत्व सिद्ध करावे.” तसेच, विद्यार्थ्यांनी २० वर्षांनंतरही शिक्षकांविषयी जपलेले प्रेम आणि कृतज्ञता पाहून आपण भावूक झाल्याचे त्यांनी व्यक्त केले.
शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक कैलास अनाप यांनी आपल्या भाषणात शिक्षण पद्धतीतील बदलांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “पूर्वी शिक्षकांच्या शिस्तीमुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळायचे, पण आज त्यातील बंधने कमी झाली आहेत. तरीही, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ होणे आवश्यक आहे.”
संदीप रासकर यांनी आपल्या मनोगतात “विद्यार्थी शिक्षणपरायण आणि शिक्षक विद्यार्थीपरायण असतो, जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थाने ज्ञानपरायणता निर्माण होते,” असे सांगितले. तसेच, सुजाता नगरकर यांनी “नाती जोडणे आणि ती टिकवणे महत्त्वाचे असते, आणि हा विद्यार्थी-शिक्षक स्नेह कायम रहावा,” असे प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांतर्फे प्रीतम वाघ यांनी आपली भावना व्यक्त करताना “एक सुंदर मोत्यांचा हार जसा अनुबंधाच्या धाग्याने बांधलेला असतो, तसेच हा आमचा शिक्षक-विद्यार्थी अनुबंध आहे,” असे भावनिक वक्तव्य केले. सोनम सांगळे, सौरभ सुराणा, श्रेयस लोळगे, निलेश जगताप, यांनीही आपले अनुभव आणि भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश खराडे यांनी केले, तर सूत्रसंचालन देवेंद्र वराळे, वृषाली लोखंडे आणि मेघना बोरुडे यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार बांधव तसेच माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा स्नेहमिलन सोहळा माजी विद्यार्थ्यांसाठी केवळ एक गेट-टुगेदर नव्हता, तर जुन्या आठवणींना उजाळा देणारा आणि शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा एक अविस्मरणीय क्षण ठरला
No comments:
Post a Comment