अण्णाभाऊ साठे यांची जयंती
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.
तुकाराम भाऊराव साठे ( अण्णा भाऊ साठे )
बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, ’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.
श्रेष्ठतेच्या कल्पनेतून हिंदू धर्माचे सुकाणू असलेल्यांनी आपल्याच समाजबांधवांना हजारो वर्षे गावाबाहेर ठेवले. त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेताना त्यांना मात्र कायम अज्ञानात आणि अस्वच्छतेत ठेवले. सगळ्याच संधी नाकारलेल्या समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी अक्षरशः मिळेल ते काम केले. कुठल्याही शाळेत न जाता ते स्वतःच्या क्षमतेवर शिकले.
परिसरात कुठेही दरोडा पडला किंवा चोरी झाली की पोलिस लगचे अन्नाभाऊच्या वस्तीत येऊन लोकांची धरपकड करायचे. अशा वेळी घरातील पुरुष-बायका दिवस दिवस डोंगरात जाऊन लपायचे. खालच्या जातीतील म्हणून गावात कुणाला शिवायचे नाही, हातात हात मिळवायचा नाही, हे अण्णांनी लहानपणीच पाहिले. अनुभवले. अगदी वर्गातही त्या काळी प्रत्येक जातीची मुले वेगवेगळी बसत. त्यामुळे अण्णांनी एक दिवस वडिलांना विचारले…
“तुमच्या मबईत जातीची शिवाशिव आहे का” ?? वडील म्हणाले, “व्हय…. चहाच्या हॉटेल मालकांनी फुटक्या कपबशा बाहेर ठीवल्या आहेत. त्यातच आपल्या जातीची माणसं बाहेर बसून च्या पेत्यात. तसं बघाय गेलं तर आम्हाला कोनीच वळखत न्हाय, पन ह्यो जुना रिवाज हाय म्हनून आम्ही आपलं बाईर बसून पेतो. उगीच कोनाची खटखट नको म्हनून. इंग्रज सायेबाकडं ही शिवाशिव नसती. मी त्येंच्याकडं माळीकाम करायला गेलो म्हंजी ते मला तेंच्याच कपात च्या देत्यात. तेंच्याकडे एकच माणसाची जात. आमची माणसं नस्ती आडगी. म्हनूनच इंग्रज आमच्यावर राज्य करत्याती. अन् आमी एका देशाचं असून आम्ही एकमेकाला शिवून घेत न्हाय.”
परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. अण्णाभाऊ पहिल्यांदा वाटेगावच्या शाळेची पायरी चढले; पण शिक्षकांच्या निर्दयी मारामुळे दोन दिवसांतच त्यांनी शाळेचा धसका घेऊन शाळेकडे कायमचीच पाठ फिरवली. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.लहानपणापासूनच अण्णाना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. अण्णाभाऊंच्या बालपणातल्या घडणीमध्ये त्यांच्या मूलभूत आवडींचा वाटा जास्त आहे. गर्दीपासून दूर असे डोंगर, दर्या, राने, नद्या या ठिकाणी भटकणं त्यांना आवडे. त्यातूनच पक्षिनिरीक्षण, शिकार करणं, मध गोळा करणं हे छंद त्यांना जडले. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. शिवाय मैदानी खेळांचा वारसा मिळाल्यामुळे दांडपट्टा चालवण्यातही ते प्रवीण होते. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र-मंडळी जमलेली असत.
ऑगस्ट १, इ.स. १९२० रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मांग कुटुंबात अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. या दांपत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत.
अण्णा वाटेगावमध्ये असताना वडिलांचं निधन झाल्यानंतर लवकरच अण्णा भाऊंनी कोंडाबाई या अशिक्षित मुलीशी विवाह केला. त्यांच्यापासून त्यांना एक मुलगाही झाला. मात्र, त्यांच्यासोबतच्या संसारात ते स्थिर झाले नाहीत.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णाभाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ‘लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली.माटुंग्याच्या लेबर कँपमधील मंडळीं विशेषत: नाशिक, सातारा, नगर जिल्ह्यातून येऊन स्थायिक झाले होते. बहुतेक गिरण्यात, गोदीत, नगरपालिकेत नोकरीला होती. इथेच अण्णाभाऊंची नाळ कम्युनिस्ट पक्षाशी जोडली गेली. याच कँपच्या नाक्यावर `लेबर रेस्टॉरंट’ होते. इथेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अड्डा होता. या रेस्टॉरंटमध्ये आण्णाभाऊंनी डासावर पोवाडा लिहिला होता. टिटवाळा येथे १९४४ साली झालेल्या शेतकरी परिषदेत लालबावटा कलापथकाची स्थापना झाली.१९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली. सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले.
१९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत होते. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.
विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी वैशिष्ट्यपूर्ण भर घातली ती शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सहभागानेच. महाराष्ट्रातील लोकांना या वारणेच्या वाघाचे दर्शन पहिल्यांदा तमाशातच झाले. तमाशासारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा, व समृद्धी अण्णा भाऊंनीच मिळवून दिली.
अण्णा भाऊंच्या बालपणातल्या घडणीमध्ये त्यांच्या मूलभूत आवडींचा वाटा जास्त आहे. गर्दीपासून दूर असे डोंगर, दर्या, राने, नद्या या ठिकाणी भटकणं त्यांना आवडे. त्यातूनच पक्षिनिरीक्षण, शिकार करणं, मध गोळा करणं हे छंद त्यांना जडले. जत्रांमध्ये जाऊन तिथल्या गोष्टींचं निरीक्षण करणंही त्यांच्या आवडीचं एक काम होतं. त्यात नंतर हळूहळू पाठांतराची भर पडत गेली. लोकगीतं, पोवाडे, लावण्या पाठ करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकणं आणि इतरांना सांगणं या त्यांच्या छंदातून त्यांच्याभोवती समवयीन मुलांचा गोतावळा जमत असे. शिवाय मैदानी खेळांचा वारसा मिळाल्यामुळे दांडपट्टा चालवण्यातही ते प्रवीण होते.मुंबईतली सुरुवातीची वर्षं ही अण्णा भाऊंसाठी वैचारिक जडणघडणीची ठरली. तिथे चित्रपटापासून विविध राजकीय पक्षांपर्यंतचं मोठं जग त्यांना जवळून पाहायला मिळालं. गरिबी अनुभवलेल्या अण्णा भाऊंची कम्युनिस्ट विचारप्रणालीशी जवळीक झाली. मुळातच कार्यकर्ता व्यक्तिमत्त्वाचे तरुण अण्णा अंगभूत गुणांमुळे कम्युनिस्ट चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये सहजपणे मिसळून गेले. मुंबईत अण्णा भाऊंनी उदरनिर्वाहासाठी बूटपॉलिश, हमाली, वेटर, घरगडी, कुत्र्याला सांभाळणं, मुलांना खेळवणं, खाण कामगार अशी अनेक प्रकारची कामं केली. या सगळ्यातून त्यांचं अनुभवविश्व घडत गेलं. या शहरात त्यांना आणखी एक छंद जडला तो सिनेमा पाहण्याचा.
‘कार्यकर्ते लेखक’ असं अण्णाभाऊंना म्हटलं गेलं, कारण आपल्या साहित्याला त्यांनी सामाजिक चळवळींशी जोडलं. सामान्य कष्टकरी लोकांशी असलेली त्यांची बांधिलकी त्यांच्या साहित्यातून आणि कार्यातून दिसते. त्यांनी ‘वैजयंता’ या स्वतःच्या कादंबरीच्या प्रस्तावनेत आपली लेखनभूमिका अण्णाभाऊनी विषद केली आहे, ती अशी….
अण्णांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्या लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे या तिघांनी १९४१, १९४२ मुंबई शहरावर अधिराज्य गाजविले. याच काळात बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावर अण्णांनी `बंगालची हाक’ हा पोवाडा रचला. संयुक्त महाराष्ट्रलढ्यात त्यांनी कामगार जागा करुन त्यांची एकजूट संघटना निर्माण केली.
पुरोगामित्वाची परंपरा..
अण्णाभाऊ हे आपल्या कार्यक्रमाची सुरवात एखाद्या देवाचे नाव न घेता छत्रपती शिवरायांच्या नावाने करायचे… तमाशात पारंपारिक श्रीगणेशा… अण्णांनी तमाशाला नवेरुप दिलं. पहिल्या नमनात मातृभूमी हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांचा समावेश झाला, गणातील कृष्ण आणि गवळणी त्यांनी काढूनच टाकल्या. गवळण झिडकारून ‘मातृभूमिसह’ ‘शिवरायांना वंदन’ करण्याची परंपरा अण्णाभाऊनी रुजवली ती अशी….
छत्रपती शिवाजी चरणा |
स्मरोनी गातो कवणा || “
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील आंबेडकरी जलसाची जनप्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या लोकनाटय़ातून पुढे नेली. त्यांनी मराठी व भारतीय साहित्य-संस्कृतीच्या उच्चभ्रू पांढरपेशी कक्षा रुदावल्या. त्यामुळे अण्णा भाऊंचे साहित्य इंग्रजी, रशियन, फ्रेंच, झेक आदी जागतिक भाषांतही अनुवादित झाले. मराठीतील ज्येष्ठ साहित्यक व दलित साहित्याचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी अण्णा भाऊंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्याशी केली आणि ‘महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की’ असा गौरव केला.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची? ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), अण्णाभाऊसाठे शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्यकाही लोकनाट्ये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.
१६ ऑगस्ट १९४७ ला अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईत मोर्चा काढला. तथाकथित स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवसी हा या स्वातंत्र्याच्या विरोधातील मोर्चा होता. या मोर्च्याला कम्युनिस्टांनी विरोध केला. या पक्षात अण्णाभाऊ कार्य करीत होते. तरीपण हजारो लोकांच्या उपस्थितीत तो मोर्चा झाला. या मोर्चातील प्रमुख घोषणा होती…
ये आझादी झुटी है, देश की जनता भुकी है !!
अण्णा भाऊ साठे हे लावण्या, शाहिरी काव्ये, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.अण्णा भाऊ साठे यांची वगनाट्येही अत्यंत महत्त्वाची आहेत. या वगनाटयांसाठी अण्णा भाऊंनी तमाशा या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला. तमाशाच्या पारंपरिक सादरीकरणातील गण, गवळण, बतावणी आणि वग या घटकांपैकी गण, काही प्रमाणात बतावणी आणि वगनाटय हे तीन घटकच अण्णा भाऊंनी स्वीकारले. असे असले तरी तमाशाच्या पारंपरिक आकृतिबंधात अण्णा भाऊंनी वगनाटयाच्या रूपाने पुष्कळ बदल घडवून आणले. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटये अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरुडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.
जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।।
गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।
अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।।
धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।।
मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।।
ठरवून आम्हा हीन अवमानीत । जन्मोजन्मी करुनी अंकित ।।
जिणे लादून वर अवमानीत । निर्मुन हा भेदभाव ।।
एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।।
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रगट निज नाव ।।
गीतकार- साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे.